CCI Kapus Kharedi : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी संपूर्ण भारतवर्षात सीसीआय, भारत कपास निगम लिमिटेड म्हणजेच भारतीय कापूस महामंडळाकडून खुल्या बाजारातून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. खरं पाहता सीसीआय हमीभावात कापसाची खरेदी करते. गेल्या वर्षी तर हमीभावात देखील कापूस खरेदी झाली नव्हती.
यंदा मात्र सीसीआयने खुल्या बाजारात जो दर मिळत आहे त्या दरात कापूस खरेदीचं टार्गेट ठेवलं. महाराष्ट्रात सद्यस्थितीला सहा केंद्र सुरू करून सीसीआयने कापसाची खरेदी सुरू केली आहे. पण खुल्या बाजारातून कापूस खरेदीचा सीसीआयकडून केवळ देखावा केला जात आहे. कारण की बाजारभावापेक्षाही कमी दर सीसीआय कापसाला देत असल्याचे उघड झाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होताना पाहायला मिळत आहे. सध्या बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. मात्र सीसीआयकडून सहा हजार 68 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव म्हणजे हमीभावातच कापसाची खरेदी सुरू असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
आतापर्यंत सीसीआयच्या भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा आणि अंबड या सहा खरेदी केंद्रावर 5724 क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सद्यस्थितीला सीसीआयकडून कमी दर दिला जात असल्याने तसेच खुल्या बाजारात देखील कापूस उत्पादकांना अपेक्षित असा दर मिळत नसल्याने त्यांनी कापसाची विक्री ऐवजी साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
सद्यस्थितीला सीसीआय पेक्षा खाजगी बाजारात चांगला दर आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांना पैशांची निकड आहे असे शेतकरी सीसीआय ऐवजी खाजगी बाजाराला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सीसीआयची सुरू झालेली खरेदी केंद्र ओस पडतील असे चित्र पाहायला मिळत आहे.
खरं पाहता सीसीआयने खुल्या बाजारातून कापूस खरेदी करण्याचे सांगितले असल्याने कापूस दराला याचा आधार मिळेल असा जाणकारांचा अंदाज आहे. मात्र काही मीडिया रिपोर्ट मध्ये सीसीआय हमीभावाच्या दरातच कापूस खरेदी करत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे.
दरम्यान कापूस उत्पादकांना कापसाचे दर वाढतील अशी आशा असून जाणकारांनी देखील याला दुजोरा दिला आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत आपल्याला परवडत असलेला दर मिळाला तर कापसाची टप्प्याटप्प्याने विक्री करत रहावे, जेणेकरून दरात घसरण झाली तर अधिक नुकसान होणार नाही. तसेच एकदम सर्व कापूस विकू नका जेणेकरून भविष्यात वाढ झाली तर तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल.