Lemon Price : उन्हाळी हंगामाच्या सुरवातीला लिंबाचे उत्पादन घटल्याने लिंबाचे बाजारभाव वाढले असून, लिंबाचा आंबटपणा लिंबू उत्पादकांना गोड वाटत आहे. फेब्रुवारी अखेरीला लिबाने १०० री पार केली आहे.
लिंबाचे बाजार वाढत असताना आवक मात्र कमी झाली आहे. उत्पादनाच्या तोडीत येणाऱ्या काळात लिंबाचे बाजार वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना भर उन्हळ्यात लिंबू शरबतचा अस्वाद घेणे मुश्किल होणार आहे.
तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टरवर लिंबाच्या बागा असून, येथील लिबाला देशासह परदेशात मागणी आहे. तालुक्यातील बेलवंडी कृषी सर्कल मध्ये सर्वाधिक लिंबाच्या बागा असून, कोळगाव, काष्टी, देवदैठण, मांडवगण कृषी सर्कलमध्ये कमी अधिक प्रमाणात लिंबाच्या बागा असून, तालुक्यात एकूण ४०० टन लिंबाचे उत्पादन होत असते.
मात्र, अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, पावसामुळे हस्त बहार कमी लागल्याने आताच्या परिस्थितीत ७० ते ८० टन उत्पादन होत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील लिंबाला जयपूर, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू कन्याकुमारी कलकत्ता, दुबई, या भागातील लिंबाला मोठी मागणी असते.
ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ८० रुपयांपासून १०५ रुपयांपर्यंत लिंबाला बाजार मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी १२० ते १४० रुपये मोजावे लागत आहेत. एरवी कमी भावात विकल्या जाणाऱ्या लिंबाचे यावर्षी उन्हाळ्यापूर्वीच भाव वाढण्यास सुरवात झाली.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला भाव मिळत असून, उत्पादन कमी असल्याने भाव मिळूनही शेतकऱ्यांचा फारसा फायदा होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागणी एवढा पुरवठा होत नसल्याने मार्चपासूनच भाववाढीला सुरवात झाली. फेब्रुवारीच्या अखेरीस वाढत शंभरी ओलांडून गेला आहे.
द्राक्ष डाळींब सिताफळ इत्यादी फळबागेपेक्षा लिंबु बागेस खर्च कमी आणि नफा जास्त आहे वार्षिक दराचा आलेख पाहिला तर किमान ३५-४० रूपयाचा बाजार लिबास हमखास मिळतोय. लिंबावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास लिंबाला कायमस्वरूपी बाजारभाव मिळणे शक्य होणार आहे म्हणून लिंबू उत्पादकांनी लिंबावर प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी भर द्यावा. –गोरख आळेकर, लिंबू उत्पादक