Jowar Market : यंदाच्या वर्षी ज्वारीने रेकॉर्ड केले आहे. इतिहासात कधी नव्हे ते यंदा ज्वारी ७१०० रुपये क्विंटल विकली जात आहे. केवळ ज्वारीचं नव्हे तर गव्हासह बाजरीचे भावही कडाडले आहेत.
शेतकऱ्यांची जरी चांदी होत असली तरी सर्वसामान्य ग्राहकांचे मात्र किमती पाहून तोंड पांढरेफटक पडत आहे.
निसर्गातील विषम वातावरण व भुसार मालाच्या उत्पन्नाकडे शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ यामुळे यंदा विक्रमी वाढ धान्यांच्या भावात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पाथर्डीच्या बुधवारच्या आठवडे बाजारात ज्वारी ७१०० रुपये क्विंटल एवढा उच्चांकी भाव घेऊन वरच्या स्थानावर राहिली.
भुसार मालाकडे शेतकऱ्यांची पाठ
पावसाच्या लहरीपणामुळे भुसार मालाचे शेती उत्पन्न फार निघत नाही. तसेच मजुरी देखील भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुसार मालाकडे पाठ फिरवत रोख उत्पन्न देणारी पिके घेण्याकडे कल वाढवला आहे.
त्यामुळे आगामी काळात धान्य टंचाईची तीव्रता अधिक वाढणार असल्याचे दिसते. वर्षभरापासून ज्वारी, बाजरी व गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. तर ऊस, कापूस, तूर, सोयाबीन या नगदी पिकांवर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे.
ज्वारी ९ हजारांवर जाण्याची शक्यता
सध्या भुसार मालासह बटाटा, लसूण आदींचे क्षेत्र देखील घटले आहे. पुणे जिल्ह्यातून आले, लसूण, बटाटे आपल्याकडे विक्रीला येताना दिसतात. असे म्हटले जात आहे की, शासनाने गहू, बाजरी, तांदूळ, डाळी सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित न केल्यास ज्वारीचे भाव किमान ९ हजारांवर जातील.
सध्या माल थोडा आहे. त्यात जेमतेम वाढ झालेल्या ज्वारीवर पाखरांचे थवे तुटून पडतात. ज्यांच्याकडे थोडाफार माल आहे, ते विक्रीला आणायला तयार नाहीत. यंदाचा ऊस गाळप हंगाम अजून महिनाभर चालेल. त्यानंतर चाऱ्याचीही समस्या निर्माण होईल असे सांगितले जात आहे.
गव्हासह बाजरीही कडाडली
केवळ ज्वारीचं नव्हे तर गव्हासह बाजरीचे भावही कडाडले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे सगळेच बजेट हुकले आहे. आठवडे बाजारात बाजरी ३०००, तर गहू तीन ते तीन हजार ४०० रुपये,
कापूस ७ हजार, सोयाबीन ४७००, तूर ८५०० रुपये क्विंटल पर्यंत गेली आहे. सध्या एलनिनो वादळाचा परिणाम पुढील वर्षीच्या पावसावर देखील होणार असल्याचेच सांगितले जात आहे. तसे झाले तर धान्याचे भाव लवकर आटोक्यात येतील असे दिसत नाही.