Soybean Rate Update : यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील मुख्य पिकांना मोठा फटका बसला. जास्तीच्या पावसामुळे शेतात पाणी साचले यामुळे सोयाबीन समवेतच कापूस तूर इत्यादी पिकांना फटका बसला.
सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात पिवळे पडले. यातून काही शेतकऱ्यांनी आपले पीक वाचवले मात्र परतीच्या पावसामुळे या अतिवृष्टीने बचावलेल्या पिकावर देखील मोठा विपरीत परिणाम झाला. एकंदरीत निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली.
उत्पादनात घट झाली मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच यंदा देखील सोयाबीनला चांगला उच्चांकी दर मिळेल, उत्पादनात झालेली घट भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु सध्या स्थितीला सोयाबीन दरात आलेली मंदी पाहता तूर्तास तरी शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरत असल्याचे चित्र आहे.
खरं पाहता दिवाळीनंतर सोयाबीन दरात थोडी तेजी आली, सोयाबीन दर 6000 रुपये प्रति क्विंटलवर पोहचले होते. पण जागतिक बाजारात खाद्यतेल विशेषता सोयातेल आणि सोयाबीन बाजारातील नरमाईमुळे बाजार भाव पुन्हा एकदा पडले. खरं पाहता डिसेंबर मध्ये आवक वाढते मात्र बाजारभाव कमी असल्यामुळे यंदाच्या डिसेंबरमध्ये आवक खूपच कमी आहे.
सोपाने यंदा 120 लाख 40 हजार टन सोयाबीन उत्पादन झाल्याचा दावा केला आहे. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत थोडस अधिक उत्पादन होणार असा दावा केला आहे. मात्र काही जाणकार लोकांना हे मान्य नसून उत्पादनात घट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय सोपाने 25 लाख टन गेल्या हंगामातील सोयाबीन शिल्लक असल्याचं सांगितल आहे. तर जाणकारांनी अवघ दहा ते पंधरा लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याचे म्हटले आहे.
एकीकडे व्यापारी आणि सोपा शिल्लक सोयाबीनचा बाजारावर ताण असल्याचं सांगतात तर जाणकार लोक एवढ सोयाबीन शिल्लक असणं गरजेचं असल्याचं सांगतात. दरम्यान यावर्षी सोयापेंड निर्यात वाढली आहे. आतापर्यंत जवळपास दोन लाख टन सोया पेंड निर्यात झाली आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची आवक, गाळप आणि निर्यात समाधानकारक झाली असल्याने देशातील बाजाराला आधार मिळत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सोयाबीन आणि खाद्यतेल बाजाराचा देशांतर्गत सोयाबीन दरावर प्रभाव पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या सोयाबीन दर नरमलेले आहेत.
सध्या पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल असा दर सोयाबीनला मिळत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी चालू महिन्यात सोयाबीन दरात चढ-उतार राहील असे नमूद केलं असून पुढील महिन्यापासून अर्थातच जानेवारी महिन्यापासून सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीचे नियोजन करताना या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे.