अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- देशात सोळा जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार असून राज्यात सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जात आहे. नगर जिल्हाही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी सज्ज झाला असून जिल्ह्याला 39 हजार 290 डोस प्राप्त झाले आहेत.
या लसीचे डोस जिल्हा परिषदेत शित साखळी उपकरणांमध्ये ठेवण्यात आले असून येथूनच त्याचे जिल्हा शल्य चिकित्सक व मनपा स्तरावर वितरण होणार आहे.
जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, डॉ.दादासाहेब साळुंके यांनी यांच्या निगराणीखाली लसीचा पहिला साठा उतरवून घेण्यात आला व स्टोरेज करण्यात आला आहे.
डॉ.सांगळे यांनी सांगितले की, दि.13 जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता नगर जिल्ह्यासाठी 39 हजार 290 कोविड 19 लसीचे डोस प्राप्त झाले आहेत.
राज्य कुटुंब कल्याण केंद्र पुणे या कार्यालयामार्फत हे डोस नगर जिल्ह्याला मिळाले असून ते 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवण्यात आलेले आहेत.
राज्यस्तरावरुन केंद्रांची संख्या निश्चित झाल्यानंतर लाभार्थींच्या संख्येनुसार संबंधित केंद्रावर डोसेसचे वितरण केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेतील डोस स्टोरेजसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी विनित धुंदाळे, गिरीश धाडगे, किरण शेळके, सुनिल सुंबे, इमरान सय्यद या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved