सूरत : गुजरात राज्यातील विविध भागातून १ कोटीहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत ५ जणांना अटक केल्याची माहिती रविवारी सूरत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बनावट नोटांसंदर्भात सूरत गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शनिवारी सूरत जिल्ह्यातील काम्रेज भागातून प्रतीक चोडवाडियाकडून २ हजार रुपयांच्या २०३ नोटा जप्त करण्यात आल्या.
त्याची चौकशी केल्यानंतर आणखी चार जणांविषयी माहिती मिळाली. यानंतर खेडा जिल्ह्यातील अंबाव गावातील बांधकाम सुरू असलेल्या एका मंदिरातील खोलीतून एका व्यक्तीला ताब्यात घेत ५० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
या कारवाईअंतर्गत सार्थाना येथून आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान गुन्हे पथकाने २ हजार रुपयांच्या जप्त केलेल्या ५,०१३ बनावट नोटांची किंमत १ कोटी २६००० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.