साखर कारखान्यात ३६ लाखांचा अपहार : प्रा.तुकाराम दरेकर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्याने २०१७-१८ च्या गळीत हंगामात आपल्या नातेवाईकांच्या आणि जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावावर न आलेल्या १ हजार ३६८ टन उसाच्या स्लिपा फाडून प्रतिटन २१०० रुपये ऊस पेमेंट आणि प्रतिटन सुमारे ५५० रुपये तोडणी-वाहतूक काढून ३६ लाख २३ हजारांचा अपहार केल्याची चौकशी प्रादेशिक सहसंचालकांनी तृतीय विशेष लेखा परीक्षक वर्ग – १ , सहकारी संस्था (साखर ) यांच्यामार्फत करावी, अशी मागणी श्रीगोंदे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी रविवारी केली.

२०१७-१८ या हंगामात नात्यातील आणि जवळच्या नऊ लोकांच्या नावावर सरासरी २२ टनांच्या ६२ खेपा दाखवून १३६८ टन काट्यावर न आलेल्या उसाच्या स्लिपा फाडून त्या नऊ जणांच्या नावावर ३६ लाख २३ हजार ११६ रुपयांचे बिल काढले.ऊस दर आणि तोडणी वाहतूक मिळून त्यांना प्रतिटन २६५० रुपये मिळाले.

यामुळे त्या हंगामात गळीत झालेल्या साडेसहा लाख टनावर शेतकऱ्यांना प्रतिटन साडे पाच रुपयांचा फटका बसला आहे. ज्या नऊ जणांच्या नावावर २० दिवसांत १ हजार ३६८ टन उसाच्या ६२ स्लिपा फाडल्या गेल्या, त्या स्लीपांवर ऊस कोणत्या वाहनाने आला? वाहनाचा नंबर? ऊस कोणत्या गटातून आला?

ऊस तोडणी ठेकेदाराचे नाव चिट बॉयचे नाव, काटा क्लार्कचे नाव व सही यांची नोंदच नाही. प्रत्येक खेप सरासरी २२ टन दाखवली आहे. ज्यांना ऊस नव्हता किंवा ज्यांचे क्षेत्रच त्या गावात नाही त्यांच्या नावावर तेथून उस आलाच कसा? त्या हंगामात कारखान्याचे प्रतिहेक्टरी सरासरी उस उत्पादन ८६ टन असताना नऊपैकी एका शेतकऱ्याचा ५० आर क्षेत्रात १६१ टन म्हणजे हेक्टरी ३२२ टन ऊस भरला आहे.

हे उद्योग करण्यासाठी पदाधिकाऱ्याने वजन काट्यावर विश्वासातील रोजंदारी कामगार ठेवला असून, त्यानेही आपला हात धुवून घेतला आहे. त्याच्या उत्पन्न स्रोताची चौकशी करावी. ऊस उत्पादक नसलेल्या या नऊ जणांचे पेमेंट त्यांच्या खात्यावर वर्ग केले की, त्यांना चेक देऊन वटवले, याचीही चौकशी झाली पाहिजे. योग्य वेळी आपण हे सर्व पुरावे सादर करू, असेही प्रा. दरेकर यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment