विनापरवानगी सहल प्रकरणी डॉन बॉस्को विद्यालयावर कारवाई व्हावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  विनापरवानगी बेकायदेशीरपणे सहल काढणार्‍या डॉन बॉस्को माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक, संस्थाचालक व सहल प्रमुखावर दीड वर्ष होऊन देखील शिक्षण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली नसल्याने शाळेच्या पालक व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण सचिवांना स्मरणपत्र पाठविले आहे.

सावेडी येथील डॉन बॉस्को माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दि.17 जानेवारी 2019 रोजी वसई-विरार या ठिकाणी दोन दिवसांची बेकायदेशीर सहल आयोजित केली होती.

हि सहल खाजगी लक्झरीने व शिक्षण विभागाच्या विना परवानगीने नेण्यात आली होती. या लक्झरी बसचा आळेफाटा (जि. पुणे) परिसरात अपघात होऊन, त्यामध्ये एक शिक्षक, चालक व वाहकाचा जागीच मृत्यू झाला.

तर या अपघातांमध्ये 22 ते 25 विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. या सर्व घटनेस विनापरवानगी खाजगी बसने सहल काढणारे मुख्याध्यापक,

संबंधित शाळेचे संस्थाचालक व सहल प्रमुख जबाबदार असल्याचा आरोप पालकांच्या वतीने करण्यात आला आहे. सदर बेकायदेशीर सहलीची गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती नगर) रामदास हराळ यांनाही या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक,

संबंधित शाळेचे संस्थाचालक व सहल प्रमुख जबाबदार असल्याचे आढळून आल्याने त्यांनी दि.2 ऑक्टोबरला माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना चौकशी अहवाल सादर केला.

मात्र वारंवार चौकशी व पाठपुरावा करुन देखील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून संबंधीतांवर कारवाई करण्यात आली नाही.

सदर शाळेच्या मुख्याध्यापकावर त्वरीत निलंबनाची कारवाई करावी, योग्य कलमाखाली सदर शाळेच्या मुख्याध्यापक, संबंधित संस्थाचालक व सहल प्रमुखावर गुन्हे दाखल करावे,

या घटनेत तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पोले यांनी सदर मुख्याध्यापकास पाठीशी घालून सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी स्मरणपत्राद्वारे करण्यात आली आहे.

अन्यथा शिक्षण विभाग व संबंधीत शाळेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

स्मरणपत्रावर पालक सोन्याबापू भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आल्हाट, संदिप ठोंबे, पंकज लोखंडे, बाळासाहेब पाटोळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment