अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- वीज प्रकल्पातील ‘तो’ कर्मचारी चहा पीत होता. चहा पिताना त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची मादी बंद केलेल्या उंच गेटवरून उडी मारून बाहेर पडल्याचे दृश्य दिसले आणि त्यांची घाबरगुंडी उडाली.
याचे कारणही तसेच होते. सिक्युरिटी गार्ड बी. एन. मोरे हे चहा घेण्यासाठी दहा मिनिटापूर्वी गेट बंद करून खाली आले होते. तेवढ्यात ही घटना घडली होती. तिची आणि मोरे यांची थोडक्यात हुकाहुक झाली.
अन्यथा मोरे तिच्या तावडीत सापडले असते. या विचारानेच त्यांना घाम फुटला. अकोले तालुक्यातील कोदणी वीज प्रकल्पामधून काही दिवसापासून वीज निर्मिती बंद आहे. परंतु या ठिकाणी काम मात्र सुरु आहे.
अशा ठिकाणी बिबट्याच्या मादीची प्रसूती झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला. यामुळे वीज कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली. या बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला. मात्र ही मादी त्यात अडकली नाही.
पंधरा दिवसांनी ती पिल्लांना तेथून घेऊन जाईल, त्यामुळे गेट उघडेच ठेवा, असा सल्ला वन अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार गेट उघडे ठेवण्यात आले. पंधरा दिवस होऊन गेले. शिवाय मधल्या काळात ती दिसली नाही.
त्यामुळे ती गेली असे समजून पुन्हा गेट बंद करण्यास सुरवात झाली. रविवारी दुपारी गेट बंद असताना ही मादी उंच गेटवरून उडी मारून जाताना दिसली आणि सर्वानाच धडकी भरली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved