अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करा व गावासाठी २५ लाखांचा निधी घ्या, या आमदार नीलेश लंके यांच्या आवाहनास पारनेर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत असतानाच नगर तालुक्यात याबाबत शांतता होती.
पारनेर तालुक्यातील विविध गावांच्या बैठका घेतल्यानंतर आ. लंके यांनी बुधवारी नगर तालुक्यातील विविध गावांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.
नगर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असून, त्यापैकी आकोळनेर, खडकी व घोसपुरी येथील ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय आ. लंके यांच्या उपस्थितीत जाहिर केला. दरम्यान २२ पैकी आणखीही काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने अनेक गावांत एकमेकांमध्ये वाद निर्माण होतात. एकाच घरामध्येही अबोला निर्माण होतो. गावांमधील या वादामुळे विकास कामांवर मोठा परिणाम होत असल्याने संघर्ष टाळा, सत्तेचे विकेंद्रीकरण करून सत्तेत सर्वांना संधी द्या. विकास कामांना तात्काळ २५ लाखांचा निधी देतो अशी घोषणा आ. लंके यांनी केली होती.
पारनेर तालुक्यात या घोषणेस मोठा प्रतिसाद मिळत असताना राजकारणात अग्रेसर असलेल्या नगर तालुक्यात आ. लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद मिळणार का ? याची तालुक्यात उत्सुकता होती.
मात्र नगर तालुक्यातही आ. लंके यांच्या पॅटर्न स्वीकारल्याचे चित्र बुधवारी पार पडलेल्या विविध बैठकांमधून दिसून आले. अर्ज दाखल करेपर्यंत २२ पैकी अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved