संगमनेर आणि पारनेरनंतर आता श्रीरामपूरची पाळी; डॉ. सुजय विखेंचा विरोधकांना इशारा

Published on -

Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, पण संगमनेर आणि पारनेरला दिलेला धडा विरोधक कधीही विसरणार नाहीत. आता श्रीरामपूरसाठी थोडे थांबा, मी लक्ष देतो, असा सूचक इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिला. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे शुभम मंगल कार्यालयाजवळ प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 101 घरकुलांच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

डॉ. सुजय विखे यांनी आपल्या भाषणात सामाजिक एकता, महिलांचे सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि गुन्हेगारीविरोधी उपाययोजनांवर जोर दिला. “गुन्हेगारांचा कोणताही धर्म नसतो. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रित कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे आणि आपल्या हक्कांसाठी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले. काहींची नावे न घेता त्यांच्याबद्दल आदर असल्याचेही त्यांनी नम्रपणे सांगितले.

प्रस्तावनात बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून माजी महसूलमंत्री आणि सध्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून गावठाण आणि घरकुले मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मैत्री ग्रुपच्या माध्यमातून हे स्वप्न आज साकार झाले.” गावकरी भविष्यातही विखे कुटुंबाला साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याला उत्तर देताना डॉ. सुजय विखे यांनी दत्तनगरच्या प्राथमिक शाळेसाठी आणि गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.

हा सोहळा जनसेवा मंडळ आणि नाना शिंदे मित्र मंडळ यांनी यशस्वीपणे आयोजित केला. दत्तनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने झाला. त्यांनी गावठाणाला मंजुरी मिळवून या योजनेचा पाया घातला. या योजनेत 15 एकरावर 650 घरकुले उभारली जाणार असून, पहिल्या टप्प्यात 101 घरकुलांचे भूमिपूजन झाले. सरपंच सारिका कुंकलोळ यांनी आपल्या भाषणात ही योजना गावाच्या समृद्धीचा पाया असल्याचे सांगितले. “ही फक्त घरे नाहीत, तर गावकऱ्यांचे स्वप्न आहे. यामुळे भूमिहीन आणि गरजूंना हक्काचे घर मिळेल,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी राधाकृष्ण विखे आणि डॉ. सुजय विखे यांचे आभार मानले.

यावेळी सुरेंद्र थोरात, भीमराज बागुल, दीपक पठारे यांनीही आपले विचार मांडले. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष दीपक पटारे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, बाजार समिती उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच सारिका कुंकलोळ, बाजार समिती सभापती नानासाहेब पवार, जिल्हा परिषद सभापती शरदराव नवले, माजी पंचायत समिती सभापती संगीताताई शिंदे, उपसरपंच कुसुमबाई जगताप, ग्रामविकास अधिकारी रुबाब पटेल आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोपात डॉ. सुजय विखे यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला. “आपण फुटलो तर नुकसान आपलेच आहे. पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी एकत्र राहा,” असे ते म्हणाले. या सोहळ्याने दत्तनगरातील अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणले. या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. टिळकनगर, दत्तनगर, रांजणखोल, एकलहरे, खंडाळा, उक्कलगाव येथील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंकज बागुल यांनी आभार मानले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe