अहिल्यानगर ब्रेकिंग ! विखे पाटलांकडून ऑपरेशन लोटस…जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का

Updated on -

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील ऑपरेशन लोटसची सुरुवात अकोले तालुक्यापासून झाली आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता भांगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उत्साह निर्माण झाला आहे.

दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमानिमित्त मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आणि भाजपमध्ये सामील होण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. लवकरच ऑपरेशन लोटस होणार असल्याचे सूचक विधान करून त्यांनी एक प्रकारची राजकीय धक्क्याची रणनीती दर्शविली होती.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार वैभव पिचड श्रीमती सुनीता भांगरे यांनी दिवाळीत मंत्री विखे पाटील यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली होती. मंत्री विखे पाटील यांनी पिचड आणि भांगरे यांच्यात योग्य समन्वय साधून अकोले तालुक्यातून राजकीय धक्क्याची रणनीती सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष ए. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील अनेक गावातील सरपंच आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी जलसंपदा आणि पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे, कोपरगावचे माजी महापौर सुहास वहाडणे, विनायकराव देशमुख आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष ए. रवींद्र चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि तुमचा विश्वास कुठेही तुटू देणार नाही आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात सबका साथ सबका विकास या मंत्राने चांगले काम केले जात आहे, अशी ग्वाही दिली. तुम्ही तुमच्या क्षेत्रात चांगले काम कराल आणि पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी काम कराल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात भांगरे कुटुंबियांना भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयाबद्दल अभिनंदन केले आणि अकोले तालुका भाजपचा बालेकिल्ला करण्यासाठी सर्वांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरेल असा विश्वास व्यक्त केला आणि अकोले तालुका १०० टक्के भाजपा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

माजी आमदार वैभव पिचड यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुरू केलेला पक्षप्रवेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले आणि तालुक्यातील सर्व गट आणि मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी होतील अशी ग्वाही दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News