Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणकुमार नाहाटा आणि गजनिया शेल्टर्स कंपनीचे संचालक अजय चौधरी यांच्यावर एका सॉफ्टवेअर अभियंत्याची २ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत ११ जणांना फसवल्याचे समोर आले असून, एकूण फसवणुकीची रक्कम ९ कोटी ४९ लाख ३५ हजार रुपये आहे.
यासंदर्भात राहुल रामराजे मक्तेदार (वय ४३, रा. शंकर कलाटेनगर, वाकड) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, प्रवीणकुमार नाहाटा (रा. ईशान्य सोसायटी, शंकर महाराज मठाजवळ, पुणे-सातारा रोड), अजय चौधरी (रा. गजनिया गार्डन, भांडारकर रोड) आणि रविराज जोशी (रा. सिंहगड रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

राहुल मक्तेदार हे सॉफ्टवेअर अभियंता असून त्यांच्या पत्नीची सॉफ्टेज मॉड्युलर फर्निचर नावाची कंपनी आहे. अजय चौधरी यांच्या भांडारकर रोडवरील फ्लॅट, कार्यालय आणि टेरेसच्या फर्निचर आणि खिडक्यांच्या कामादरम्यान त्यांची ओळख झाली. त्यावेळी चौधरी यांनी प्रवीणकुमार नाहाटा यांची भेट घडवून दिली.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र सरकारच्या मॅग्नेट (महाराष्ट्र अँग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट) योजनेअंतर्गत एक कृषी उत्पादक कंपनी स्थापन केली जाईल आणि तुम्हाला तिचे संचालक बनवले जाईल, असे सांगण्यात आले. यात २० लाख रुपये गुंतवल्यास ७८ दिवसांनंतर सरकारी योजनेनुसार ६० लाख रुपये परतावा मिळेल. यापैकी २५ लाख रुपये ते स्वतःसाठी, ५ लाख रुपये अजय चौधरी यांना मध्यस्थीचे कमिशन आणि ३० लाख रुपये तुम्हाला परतावा म्हणून मिळतील, असे नाहाटा यांनी सांगितले. परतावा मिळाल्यानंतर तुमचा राजीनामा घेतला जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले. सुरुवातीला मक्तेदार यांनी गुंतवणूक नाकारली होती. मात्र, नाहाटा यांनी “मी बाजार समिती संघाचा अध्यक्ष आहे, ही सरकारी योजना आहे,” असे सांगितल्याने विश्वास ठेवून मक्तेदार यांनी दागिने विकून या योजनेत पैसे गुंतवले.
२ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक
याशिवाय, अजय चौधरी यांनी पाचगणी येथील दांडेघर गावातील (हॉरसन फॉली) जमीन विकसनासाठी १ कोटी ६० लाख रुपये हातउसने मागितले. एका महिन्यात पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी ही रक्कम घेतली. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी मक्तेदार यांनी ही रक्कम दिली. मात्र, चौधरी यांनी दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत, कारण त्यांनी बँकेला धनादेश न वटविण्याचे निर्देश दिले होते. अशा प्रकारे दोघांनी मिळून २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी मक्तेदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. आतापर्यंत ११ जणांना फसवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निरीक्षक निंबाळकर यांनी केले आहे.
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी
बाळासाहेब ऊर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांना महत्त्वाचे पद असून त्यांच्या विरोधात असलेल्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांमुळे पक्ष देखील अडचणीत आला आहे. पुण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे नाहाटा आणि त्यांच्या कुटुंबावर संशयाची छाया पडली असून, त्यांच्या मुलावरही गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तीला जबाबदारीच्या पदावर ठेवणे, पक्षाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. नगरच्या पदाधिकाऱ्यांवर पुण्यात गुन्हे दाखल झाले असून, त्यामुळे अजित पवारांची आणि त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर बदनामी होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
अजित पवार नाहाटा यांच्यावर इतके मेहेरबान का?
श्रीगोंदा तालुक्यात सध्या एकच चर्चा रंगली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाहाटा यांच्यावर इतके मेहेरबान का ? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पक्षात संधी दिल्यास, सामान्य कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होऊ शकते. नाहाटा यांच्यावर असलेले गंभीर आरोप आणि तपास सुरू असतानाही, त्यांना पदावर कायम ठेवणे म्हणजे पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारे पाऊल ठरत आहे. पक्षांतर्गत पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, अजित पवार यांनी या प्रकरणात खुली भूमिका घेण्याची गरज आहे.