माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या गाडीला भीषण अपघत झाला आहे. जेसीबीला समोरासमोर धडक झाल्याने कळमकर यांच्या गाडीचा पुढील भागाचा अगदी चक्काचूर झाला होता. दरम्यान या भीषण अपघातात एअरबॅग्ज उघडल्याने दादाभाऊ कळमकर यांच्यासह तिघेही बचावले आहेत.
याबाबत सविस्तर अधिक माहिती अशी कळमकर यांच्या टोयाटो कंपनीच्या इनोव्हा गाडीला १६ जून रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील वडझिरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कळमकर यांच्यासह वाहन चालक तसेच त्यांचे सहकारी पानमंद हे तिघे सुखरूप आहेत. मात्र वाहनाचे समोरील बाजूने मोठे नुकसान झाले आहे.

कळमकर हे त्यांचे सहकारी पानमंद यांच्यासह इनोव्हा गाडीने दुपारी पारनेरहून वडझिरे येथे एका विवाह समारंभासाठी जात होते. वडझिरे गावापासून अलीकडे १ किमी अंतरावर समोरून आलेल्या जेसीबीची आणि त्यांच्या गाडीची जोराची धडक झाली.
या धडकेने इनोव्हा गाडीच्या एअरबॅग उघडल्या गेल्या. त्यामुळे चालकासह गाडीतील तिघांनाही मोठी दुखापत झाली नाही. या भीषण अपघातातून सर्वजण सुखरूप बचावले आहेत. अपघातात गाडीचे पुढील बाजूने मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.