अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी एक अल्पवयीन मुलगा ताब्यात !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सार्थक आंबादास शेळके या ११ वर्षीय मुलाच्या हत्येचे कोडे उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे.

या हत्येप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीने आपले चोरीचे बिंग फुटू नये म्हणून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या अल्पवयीन मुलाची रवानगी श्रीरामपूर येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे सोमवार दि. १० रोजी सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान धारदार शस्त्राने मानेवर वार करून सार्थक शेळके याची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी मयत सार्थकचे वडील आंबादास शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्­या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येमधील मारेकरी अज्ञात असल्याने तपास लावण्याचे मोठे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर उभा राहिले होते.

तपासासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, नगर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.

अनिल कटके व पोनि. प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि. सुजित ठाकरे, सपोनि. विश्वास पावरा, मिथुन घुगे, पोलिस उपनिरिक्षक सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.

या घटनेमध्ये फिर्यादी आंबादास शेळके हे कुटुंबासमवेत घराबाहेर काम करत होते. यामुळे घरात कोणी नाही असे पाहुन आरोपी हा चोरी करण्यासाठी शेळके यांच्या घरात गेला होता.

मात्र त्याचवेळी मयत सार्थक शेळके हा तेथे आल्याने आपले बिंग फुटू नये म्हणून आरोपीने हातातील धारदार शस्त्राने सार्थक शेळके याच्या मानेवर वार करून जखमी केले होते.

तपासात वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरु असतांना एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याची माहिती तपासी अधिकारी सपोनि. सुजित ठाकरे यांना समजली.

या माहितीची खातरजमा करून आरोपीला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. ताब्यातील अल्पवयीन आरोपीला श्रीरामपूर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News