Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुक्यातील भोसे – जोहारवाडी शिवारामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळला. ही माहिती समजताच करंजी पोलीस आउट पोस्टचे पोलीस हवालदार कुसळकर घटनास्थळी पोहोचल्यानंतर या बेवारस मृतदेहाविषयी माहिती घेतली असता, ही महिला चिचोंडी, ता. पाथर्डी येथील असल्याचे समजले.
भोसे गावाजवळ एका (६५) वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती समजल्यानंतर चिचोंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा मृतदेह ओळखला,

त्यानंतर संबंधित मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाथर्डीला नेण्यात आला. त्या ठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर या महिलेचा मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.
या मयत महिलेचे नाव गंगूबाई हनुमंता फुलमाळी असल्याचे समजले. भोसे लोहसर रस्त्यावरील जोहरवाडी आठरे कौडगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला असून,
या ठिकाणी चार चाकी वाहनाच्या खुणा आढळून आल्या आहेत. तसेच ही महिला इथपर्यंत कशी पोहोचली, यासंदर्भात पोलीस सखोल माहिती घेणार असल्याचे समजले आहे.