अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- राहाता तालुक्यातील वाकडी येथे एका तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. अत्याचार व पीडितेच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आली आहे.
त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यातील मुख्य आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास अजून अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की राहाता तालुक्यातील वाकडी हद्दीतील चितळी ते राहाता रस्त्यावरील एका वीट भट्टीवर परप्रांतीय कुटुंब राहातात. येथील एका तरुणीला शेजारील एक मुलगा दोन वर्षांपासून अत्याचार करत होता.
अत्याचार करणाऱ्या मुलाच्या नातेवाईकांचा लवाजमा असल्याने पीडित मुलगी नेहमी भयभीत असायची. या तरुणीस या मुलाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने या तरुणीने हा प्रकार कोणासही सांगितला नाही; मात्र काही दिवसांत त्रास वाढल्याने या मुलीने हा प्रकार भावास सांगितला.
त्यानंतर आरोपी मुलगा व मुलीच्या भावाचे वाद झाले. त्यानंतर गुरुवार दि. ६ मे रोजी या वादाचे रूपांतर भयंकर हाणामारीत झाले. यात आरोपी मुलगा व त्याच्या सात ते आठ मित्रांनी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली.
यावेळी पीडित मुलीचे नातेवाईक मध्यस्ती करत वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनादेखील तीक्ष्ण हत्याराने या जमावाने बेदम मारहाण केली. यात मुलीच्या सहा नातेवाईकांना श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
मुलीच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला कलम भा.दं.वि. कलम ३७६, ३०७ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आकाश अशोक गोरे, कृष्णा राजेंद्र तासकर, अशोक साहेबराव गोरे, विशाल राजेंद्र तासकर,
अभिषेक राजेंद्र तासकर या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यातील मुख्य आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यास अद्याप अटक करण्यात आली नाही. पुढील तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|