Ahmednagar City News : रस्ते घोटाळा प्रकरणी कारवाई न झाल्यामुळे किरण काळे करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना समोर आत्मदहन !

Ahmednagarlive24
Published:
Kiran Kale INC

Ahmednagar City News :- रस्ते घोटाळा प्रकरणात बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टच्या आधारे मनपात सुमारे ₹ २०० कोटींच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे काँग्रेसने केली होती.

काँग्रेसने १५ दिवसांचा दिलेला अल्टीमेटम संपला आहे. मात्र हे प्रकरण तीन आठवड्यांपूर्वी चव्हाट्यावर येऊन देखील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यामुळे अखेर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचे जाहीर केले आहे.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीप्रमाणे १ जून रोजी जयंती आहे. या दिवशी आत्मदहन करण्याचे काळेंनी निश्चित केले आहे. तसे पत्र मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाने चर्चा केली आहे. यावेळी काळे यांच्यासह मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना काळे म्हणाले की, बनावट रिपोर्टची पडताळणी करणे हे चार-पाच दिवसांचे काम आहे. काँग्रेसने नागरिकांच्या वतीने सुमारे तीन आठवडे वाट पाहिली. अनेक आंदोलने केली. शहराचे आमदार, नगरसेवकांना जनतेला खड्ड्यात घालणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. मात्र लोकप्रतिनिधी, ठेकेदार, अधिकारी यांच्या संगनमतातून हा घोटाळा झाला आहे. ७० % कमिशनवर चालणारी मनपा ‘यांनी’ लुटून खाल्ली आहे. त्यामुळेच शहर खड्ड्यात गेले आहे.

अनेकांचे हात यात बरबटले आहेत. दोषींवर कारवाई करण्याऐवजी रात्रीच्या अंधारात ‘ अर्थपूर्ण ‘ तडजोडी होत आहेत. ६८ पैकी एकही नगरसेवक, आमदार, मनपा अधिकारी रस्त्यांच्या दर्जाच्या गुणवत्ता तपासणीसाठी इन कॅमेरा नागरिकांसमोर आले नाहीत. कामे निकृष्ट झाली आहेत.

म्हणूनच सर्व पळ काढत आहेत. मनपा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना चौकशी अधिकारी नेमल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात अतिरिक्त आयुक्त पठारे रजेवर होते. त्या काळात उपायुक्त यशवंत डांगेंकडे पदभार होता. त्यांनी काडीचाही तपास केला नाही. शासकीय तंत्रनिकेतनने माहिती मागवून देखील जाणीवपूर्वक दिली जात नसल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

दरम्यान, या घोटाळा प्रकरणी आता काळेंनी आत्मदहनाची तारीख, ठिकाण जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी कर्जत तालुक्यात आत्मदहन करतेवेळी एकाचा मृत्यू झाला होता. जनतेत संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर दोषींवर कारवाई झाली होती. पालकमंत्री, मनपा, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यात आता काय भूमिका घेते, याकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe