अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय चिमुरडी कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करुन सुखरुप घरी परतली आहे. आज येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेसइतर स्टाफही गहिवरला. कोरोना वॉर्डमधून बाहेर येताच त्यांनी या मुलीला पुष्पगुच्छ देत तिचे स्वागत केले आणि पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत तिला निरोप दिला.
खऱ्या अर्थाने ‘कोरोना’ला पराभूत करता येते, हे या चिमुकलीने दाखवून दिले. वेळीच उपचार घेतले तर हा आजार बरा होऊ शकतो, हा संदेशही यातून सर्वांपर्यंत पोहोचला. काही दिवसांपूर्वी ही सहा वर्षीय मुलगी आजीसोबत कर्जत तालुक्यातील राशीन येथे आली होती.
आजीला त्रास होऊ लागल्याने तपासले असता ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, यातच तिचा मृत्यू झाला. मात्र, त्या आजीबाईंच्या निकट सहवासितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यात या आजीबाईंच्या नातीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुलीला एकटे वाटायला नको, यासाठी तिच्या वडिलांनीही क्वारंटाईन होत या हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यामुळे मुलीचा एकटेपणा गेला.
डॉक्टरांच्या उपचारांनाही तिने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि आज ती बरे होऊन या हॉस्पिटलमधून बाहेर पडली. त्यामुळेच, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोनाची बाधा झालेला रुग्ण बरा होऊ शकतो, हे दिसून आले आहे.
त्यासाठी गरज आहे, ती वेळीच आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेण्याची. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, नव्हे, आपण या आजाराला पराभूत करु शकतो, हेच या चिमुरडीने दाखवून दिले आहे.
जिल्हा प्रशासन आणि सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे, संपर्क टाळण्याचे, सार्वजनिक ठिकाणी आरोग्यविषयक नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे.
गाव आणि शहरातील दैनंदिन कामकाज सुरळीत होत असताना नागरिकांनी याबाबत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. आजाराची लक्षणे असतील तर आपल्याकडून तो संक्रमित होणार नाही याची काळजी अशा व्यक्तींनी घेऊन तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे,
तर इतरांनी या आजारामुळे आपण संक्रमित होणार नाही, यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क, समोरच्या व्यक्तीशी बोलताना पुरेशे अंतर ठेवून बोलणे, सॅनिटायझर चा वापर करणे, वारंवार हात धुणे या गोष्टी अवश्य करणे गरजेचे आहे.
कारण, कोरोनाला पराभूत करु शकतो, हा विश्वास या सहा वर्षीय चिमुरडीने दिला आहे. परंतू, हा आजारच होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews