अहमदनगर जिल्ह्यातून एका कॉलेज शेजारी एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधील मालपाणी विधी महाविद्यालया जवळील विहिरीमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. रुपाली धनंजय सातपुते असे या महिलेचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास या महिलेचा मृतदेह या विहिरीमध्ये आढळला. याबाबत नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे, पोलीस कर्मचारी शरद पवार हे घटनास्थळी दाखल झाले होते.
स्थानिक युवकांच्या मदतीने विहिरीमध्ये बाज टाकून या महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पंचनामा केल्यानंतर या महिलेचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. या महिलेची हत्या की आत्महत्या याबाबत नागरिकांत चर्चा सुरु होती,
दरम्यान, या महिलेने या विहिरीमध्ये आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या महिलेचा मृत्यू कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती समजताच संगमनेर कॉलेज, लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.