Ahmednagar Politics : अहमदनगर हा राज्याचाच केंद्रबिंदू असतो हे जरी सर्वश्रुत असले तरी यावेळी मात्र राजकीय रंग कुणालाच कळेनात. त्याचे कारण असे की वरती विरोधात बसणाऱ्या पक्षांचे उमेदवार नगरमध्ये एकत्र तर एकत्र असणाऱ्या पक्षांचे उमेदवार परस्पर विरोधात बसलेले दिसतायेत. त्यातच आता लोकसभेच्या हिशोबाने विखे विरुद्ध कोण? अशा विविध चर्चा रंगत असतानाच आता एका घटनेने अहमनगर जिल्ह्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांचे कट्टर शिलेदार ऍड. ढाकणे खा. विखेंच्या व्यासपीठावर
खा. विखे व आ. राजळे यांच्या उपस्थितीत शनिवारी (१० डिसेंबर) पाथर्डी तालुक्यात कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आ. राजळे यांचे भाषण सुरू असतानाच अँड. ढाकणे यांनी या कार्यक्रमात एंट्री केली. भाजपच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. प्रताप ढाकणे दिसतातच विखे राजळेंसह सर्वच अवाक झाले.
परंतु लगेचच त्यांनी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान केला. ही कृती घडताच सर्वांनी जागेवरच उभे राहत ढाकणे यांच्याविषयी आदर व्यक्त केला.
विधानसभेचा शेवगाव-पाथर्डीचा राजकीय सामना प्रवरेच्या मैदानावरून होणार?
अॅड. ढाकणे लोकसभेसाठी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा आहे. यातच आता शेवगाव तालुक्यात सर्वपक्षीय नेत्यांशी विखे यांची जवळीक वाढवली आहे. अशा नेत्यांना ढाकणे यांनी कृतीतून इशारा दिल्याचं बोललं जात आहे.
विखे यांनी मात्र शुभ कौल मानून हा सत्कार स्वीकारून घेतला. आ. राजळे व अॅड, ढाकणे यांच्यातील राजकीय वैर कमी झाले असल्याचे दिसते. ढाकणे यांच्या या कृतीने शेवगाव-पाथर्डीचा राजकीय सामना प्रवरेच्या मैदानावरून होणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
ऍड. ढाकणे यांचे मत काय?
ऍड. ढाकणे यांनी जो भाजपच्या नेत्यांचा सत्कार केला याबाबत आपले मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, लोकनेते बाळासाहेब विखे व स्व. बबनराव ढाकणे यांनी नगर दक्षिणेत विकासकामांसाठी खूप प्रयत्न केले आहेत. दोन्ही कुटुंबाचे ४० वर्षांचे स्नेहसंबंध आहेत.
खा. डॉ. विखे हे आमच्या गावात प्रथमच आले असल्याने शिष्टाचाराची परंपरा आम्ही पाळली आहे. याचाच एक भाग म्हणून गावच्या वतीने आपण त्यांचे स्वागत केले. त्याचा कोणताही राजकीय अर्थ लावू नये. राजधर्म वेगळा असला, तरी ग्रामधर्माचे आपण पालन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.