अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना सापडत नव्हता.
त्याला मदत करणऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक पाटील स्वत: सकाळी दहा वाजता यासंबंधी सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना देणार असल्याचे सांगण्यात आले.

हैद्राबाद भागात तो असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन करून त्या भागात पाठविली.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी बोठे याच्यासह तिघांना तेथून ताब्यात घेतले.
मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यामध्ये एक महिलाही आहे. बोठे याला घर भाड्याने मिळवून देणे, मोबाईल फोन उपलब्ध करून देणे, पैसे पुरविणे अशा प्रकारची मदत या संशयित आरोपींनी केल्याची माहिती मिळाली आहे.
त्यामुळे बोठे याच्यासोबत त्यांनाही अटक होत आहे. आरोपीला घेऊन पोलिस नगरकडे निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्या भागात ही कारवाई सुरू होती.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|