सफाई कामगार म्हणून मूळ पदाचे काम न करता परस्पर गैरहजर राहिलेल्या २१ कामगारांना निलंबित करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी सायंकाळी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे या सर्वांवरील निलंबन कारवाईचे लेखी आदेश आज संबंधितांना बजावण्यात येण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या आरोग्य खात्यातील केअरटेकर-मदतनीस यांना त्यांच्या मूळ सफाई कामगार या पदावर काम करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने दिला आहे. मात्र, या आदेशाला औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली असल्याचे महापालिका कामगार संघटनेचे म्हणणे आहे.
आठवडाभर केले होते धरणे आंदोलन
प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे आदेश जारी करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचाही दावा केला आहे व न्यायालय आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेसमोर आठवडाभर धरणे आंदोलनही केले आहे.
कामावर हजर व्हावे, नाहीतर कारवाई ..
या पार्श्वभूमीवर संबंधित २१ जणांनी तातडीने सफाई कामगारपदाच्या कामावर हजर व्हावे, नाहीतर कारवाई करण्याचा इशारा देणाऱ्या नोटिसा प्रशासनाने त्यांना बुधवारी बजावल्या होत्या; मात्र, त्या त्यांनी घेतल्या नाहीत. पण महापालिकेसमोर सुरू केलेले आंदोलन मागे घेतले होते.
तातडीने निलंबित करण्याचे आदेश – जिल्हाधिकारी द्विवेदी
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी आयुक्त-जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संबंधित २१ जणांना विनापरवाना गैरहजर राहिल्याबद्दल तातडीने निलंबित करण्याचे आदेश महापालिका प्रशासन प्रमुख मेहेर लहारे यांना दिले आहेत.