अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- नगर शहर काँग्रेसमध्ये आज अचानक मोठे फेरबदल करण्यात आले. किरण काळे यांची शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करीत असल्याची घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी नंदनवन लॉन्स येथील आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये केली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,
मावळते शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जि.प चे गटनेते अजय फटांगरे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयुआय संघटनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, किरण काळे हे चांगले संघटक आहेत. आम्ही त्यांची जबाबदारी वाढवत आहोत. नगर शहर काँग्रेससाठी आता किरण यांच्या रूपाने तरुण नेतृत्व देत त्यांच्यावरती प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मी सोपवत आहे.
नामदार थोरात पुढे म्हणाले की, माजी नगरसेवक दीप चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे शहरातील ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांना आम्ही राज्य पातळीवरती संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतानाच युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसची जिल्हा समन्वयक पदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर आम्ही कायम ठेवत आहोत त्यांनी शहराबरोबरच जिल्ह्यातील संघटना वाढीसाठी काम करायचे आहे.
नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे मजबूत संघटन काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात उभे राहिल असा विश्वास यावेळी नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
काळे यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश
आगामी काळात २०१४ प्रमाणे जर विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढावी लागली तर किरण काळे यांना नगर शहरातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी करावी लागेल, असे म्हणत नामदार थोरात यांनी किरण काळे यांना थेट विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये दिले.
निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना किरण काळे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास शतप्रतिशत सार्थ करण्यासाठी मी जिवाचं रान करणार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेसची नगर शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी देखील आहे.
सर्वांना माझं आव्हान असणार आहे की यापूर्वी असणारे सर्व मतभेद, गट-तट विसरून सगळ्यांनी एकत्र यावं. या सगळ्यांची मोट बांधण्यासाठी नामदार थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः पुढाकार घेणार आहे. नगर शहरामध्ये एकसंघ काँग्रेस उभी करणार आहे.
माझ्या निवडीमध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांचा सिंहाचा वाटा आहे. गेली सुमारे एक दशकाहून अधिक काळ मी सत्यजीतदादा यांना जवळून पाहत आहे.
एक अत्यंत उत्तम संघटक आणि आणि महाराष्ट्राच्या उद्याचे एक मोठं नेतृत्व म्हणून राज्यातील युवक त्यांच्याकडे पाहतात.मला दिलेल्या संधीच नगर शहरात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी मी काम करेल, अशी भावना काळे यांनी निवडीनंतर बोलताना व्यक्त केली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved