अरुण काका जगताप : नगरच्या राजकारणाचा आधारवड कोसळला ! जाणून घ्या अरुणकाका जगताप यांचा प्रेरणादायी प्रवास !

Updated on -

Arun Kaka Jagtap passes away : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे आज, शुक्रवारी, दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने अहमदनगरच्या राजकारणातील एक पर्व संपले आहे.

राजकारण, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा – या साऱ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे अहमदनगरचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप आज आपल्यातून कायमचे निघून गेले. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजकीय आणि सामाजिक योगदान

अरुणकाका जगताप यांचा जीवनप्रवास हा कार्यकर्तृत्वाने परिपूर्ण असा होता. अरुण काका जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केली. त्यांनी अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, सलग दोन वेळा विधान परिषदेचे आमदार, तसेच जिल्हा बँकेचे संचालक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या.

नगर शहर मतदारसंघातून दोनदा पराभव स्वीकारावा लागला, तरीही त्यांनी खचून न जाता आपल्या मुलाला, संग्राम जगताप यांना, महापौरपदावर विराजमान करून आपली राजकीय वारसा पुढे नेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून त्यांनी अहमदनगरच्या राजकारणाला दिशा दिली. काही काळासाठी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी सहा महिन्यांतच त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत परत येऊन आपली निष्ठा सिद्ध केली.

क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील ठसा

अरुण काका हे केवळ राजकारणी नव्हते, तर क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे, गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही आपली छाप पाडली.

वैयक्तिक आवडी आणि व्यवसाय

अरुणकाका जगताप हे केवळ राजकारणी नव्हते, तर विविध छंद व व्यवसायांमधून जीवन समृद्ध करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांना घोडेस्वारीची विशेष आवड होती, तर नव्या गाड्यांबाबतही त्यांचा उत्साह लपून राहत नसे. शेती, उद्योग, आणि हॉटेल व्यवसायात त्यांची खास रुची होती, ज्यामुळे ते केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकांशीही घट्ट नातं निर्माण करू शकले.

कुटुंब आणि वारसा

अरुण काका यांचे सुपुत्र संग्राम जगताप हे सलग तीन वेळा अहमदनगर शहर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या सून शितल संग्राम जगताप नगरसेविका, तर स्नुषा सुवर्णा सचिन जगताप जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. दुसरे सुपुत्र सचिन जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. अरुण काका यांच्या कुटुंबाने त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा यशस्वीपणे पुढे चालवला आहे.

अंत्यसंस्कार

दिवंगत अरुण काका जगताप यांचे पार्थिव आज भवानीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी चार वाजता अहमदनगर येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अरुण काका जगताप यांच्या निधनाने नगरने एक दूरदृष्टीचा नेता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना आमचा सलाम.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News