श्रेय घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांची केवीलवाणी धडपड

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : विधानसभा मतदार संघात अनेक विकासकामे माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्या कार्यकाळात भरघोस निधी मंजूर करुन आणत झालेली आहेत. अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर झालेला होता.

जो निवडणुक प्रक्रियेनंतर विकासकामांसाठी जाणार होता. मात्र ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू होताच त्याचे श्रेय घेण्यासाठी आ.आशुतोष काळे यांची केवीलवाणी धडपड सुरू असल्याचा घणाघाती आरोप कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केला आहे. कोल्हे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,मा.आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांनी अथक परिश्रम घेत भरघोस निधी कोपरगाव तालुक्यासाठी मिळविला.

याच निधीची अनेक विकासकामे यापुढील काळात देखील सुरूच असणार आहेत. ही कामे वगळता विद्यमान आमदारांनी कोणत्या विकासकामांसाठी निधी आणला हे जनतेला सांगावे. वास्तविक मा.आ.सौ.कोल्हे यांच्या कार्यकाळातील मंजूर कामांचीच उद्घाटने व भुमीपूजने करुन ‘मीच निधी आणला आहे’ असा अविर्भाव विद्यमान आमदार दाखवत आहेत व जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा रडीचा डाव खेळत आहेत.

चासनळी येथील पुलालगतच्या रस्त्याचे काम,भुमीअभिलेख कार्यालयाची दुरूस्ती,न्यायालय इमारत स्थलांतर निधी तसेच अनेक भागातील रस्त्यांच्या कामांसाठी पुर्वीच्या सरकारकडे पाठपुरावा करत मा.आ.कोल्हे यांनी निधी आणलेला आहे.

आताच्या सरकारने अद्यापपर्यंत निधीचे वितरणही केलेले नसताना विद्यमान आमदार केवळ श्रेय लाटू पाहत आहेत. मा.आ.सौ. कोल्हे यांनी काहीच कामे केली नाहीत,असा आरोप करणारे आज मात्र त्यांनीच मंजूर करुन आणलेल्या कामांचे श्रेय घेत उद्घाटने करत प्रसिध्दी करत आहेत. स्वत:च्या प्रयत्नातून नवीन विकासकामांसाठी निधी आणावा व त्याचे खुशाल श्रेय त्यांनी घ्यावे. मात्र जे काम आपण केलेच नाही, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये,असा सल्लाही विवेक कोल्हे यांनी आमदारांना दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment