श्रीगोंदा : सध्या तालुक्यात काही नेते भाजपमध्ये जाणार त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार अशा वावड्या उडवल्या जात आहेत. परंतु त्या सगळ्या अफवा असून, श्रीगोंदा विधानसभेची भाजपची उमेदवारी आपल्यालाच निश्चित असून मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आपल्यालाच असून, तयारीला लागण्यास सांगितल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली.
श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. त्यातच आ.जगताप हे काही दिवसात भाजपात प्रवेश करणार असून, भाजपकडून त्यांना श्रीगोंदा विधानसभेची उमेदवारी दिली जाईल. अशा चर्चा होत होत्या.
त्यामुळे तालुक्यातील आ.जगताप व पाचपुते समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. नुकतीच मुंबईत बबनराव पाचपुते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळपास पाऊणतास बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती पाचपुतें यांनी दिली.
तसेच पाचपुते यांनी आ.राहूल जगताप यांचे नाव न घेता गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आणि विधानसभेची उमेदवारी त्यांनाच मिळणार अशा चर्चा होत आहेत.
पण या निव्वळ अफवा असून, संबंधित नेते भाजप नेत्यांना उमेदवारीबाबत भेटून आले पण त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याचे देखील बबनराव पाचपुते यांनी सांगितले.