शिर्डी : गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणातून शिर्डीत गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास तरुणाची हत्या करण्यात आली. विठ्ठल साहेबराव मोरे (वय ३५, रा. भीमनगर, शिर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी शिर्डी पोलिसांत खून व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीकांत राजू शिंदे (वय ३०, रा. कालिकानगर, शिर्डी) या तरुणास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सीसी टीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले. याबाबत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती देताना सांगितले की,
शिर्डीत पिंपळवाडी रोडवर सय्यदबाबा दर्गासमोर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठल साहेबराव मोरे (वय ३५, रा. भीमनगर, शिर्डी) हा तरुण ॲपेरिक्षा (क्र. एमएच १७ एए ६७४) घेऊन पिंपळवाडी रोडने घराकडे जात असताना श्रीकांत शिंदे याचेकडील इनोव्हा गाडी (क्र. एमएच १७ बीके ११००) या रस्त्यावरून जात होता.
रस्त्यात रिक्षा उभी असल्याने शिंदे याची गाडी जाण्यास रस्ता नव्हता. यावेळी दोघांत गाडी ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. यात विठ्ठल मोरे या तरुणाचा मृत्यूझाला. सीसी टीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब नोंदवून यामध्ये वादाचे काय कारण आहे आणि घटना नेमकी कशी घडली याबाबत पुढील तपास करणार आहे.
मयत मोरे यांची रिक्षा व आरोपी शिंदे याची इनोव्हा गाडी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी श्रीकांत शिंदे यास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक गोकुळ औताडे, सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे, दातीरे, रूपवते आदी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.
शिर्डी पोलिसांत कृष्णा रमेश शेजवळ (रा. शिर्डी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून गु. र. नं. १६०/२०२० नुसार भा. दं. वि. कलम ३०२, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१), (१), (२), ३(२)(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.