अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील कांदा व्यापारी ज्ञानदेव मनसुक लांडगे यांचे कर्नाटक राज्यातील काही लोकांनी अपहरण केल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदे शहरात घडली.
परंतु श्रीगोंदे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपहरण झाल्यानंतर अवघ्या काही तासातच अपहरण झालेल्या कांदा व्यापार्याची सुटका करत अपहरणकर्ते पोलिसांनी पकडले आहेत. सदर घटनेबाबत अपहरण झालेल्या लांडगे यांचे बंधू सोन्याबापू लांडगे
यांच्या फिर्यादीवरून कर्नाटक येथील व्यापारी एच एम बागवान व त्याचे सोबत असलेले अनोळखी चार ते पाच इसम यांच्याविरोधात श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि भावडी येथील ज्ञानदेव लांडगे हे कांदा व्यापारी असून कर्नाटक
येथील व्यापारी एच एम बागवान याने कांदा व्यापारासाठी चार ते पाच दिवसांपूर्वी लांडगे यांच्या खात्यावर उचल म्हणून एक लाख रुपये टाकले होते. आज दि 27 रोजी सकाळी सोन्याबापू लांडगे यांनी उचल पोटी घेतलेल्या एक लाखापैकी 70 हजार रुपये बागवान याला दिले 30 हजार रुपये थोड्यावेळाने देतो असे सांगितले.
त्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा शहरातील आर के इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरून कर्नाटक येथील व्यापारी बागवान याने व त्याच्या सहकार्यांनी त्याच्या इर्टीका गाडी क्र केए 20 झेड 6509 यामध्ये ज्ञानदेव लांडगे यांना बेकायदेशीरपणे कैद करून पळवून नेले.
त्यानंतर सोन्याबापू याना फोन करून 30 हजार रुपये नही दिये तो हम उसको नही छोडेंगे हम उसको कीडनॅप करके कर्नाटक ले जायेंगे असे सांगितले. त्यानंतर सोन्याबापू लांडगे यांनी तत्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक जाधव यांना घडलेला प्रकार सांगितला.
जाधव यांनी सायबर सेलच्या मदतीने अपहरणकर्त्यांचे मोबाईल लोकेशन घेत दौंड पोलीस निरीक्षक महाडिक यांना संपर्क साधत अपहरणकर्त्यांची माहिती दिली. परंतु तो पर्यत अपहरणकर्ते इंदापुरच्या दिशेने रवाना झाले होते. त्यानंतर पोलीस निरीक्षक जाधव यांनी इंदापूर पोलीस निरीक्षक सारंगधर यांच्याशी संपर्क साधला.
पोलिसांनी इंदापूर हायवेला सापळा लावून एका टोलनाक्यावर सदर अपहरणकर्त्यांची गाडी अडवून अपहरण झालेले ज्ञानदेव लांडगे यांची सुटका केली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved