Blog : थोडंसं मनातलं – अहमदनगर मधील बेफिकीरीला आता नक्की चाप बसणारच ! ॲड शिवाजी कराळे 

Ahmednagarlive24
Published:

नमस्कार मित्रांनो
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच अनेक रूग्ण बरे झाले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. सध्या बुथ हाॅस्पिटल कोरोना बाधीत रूग्णांनी फुल्ल भरले आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा  प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन आणि सर्व सुजाण  नागरिकांनी एकत्र मिळून ही लढाई लढणे गरजेचे आहे. अनलाॅकडाऊन भाग 2 मध्ये शहरात  प्रशासनाने शिथिलता आणली आहे. त्यामुळे दोन तीन महिन्यात थोडी विस्कळीत झालेली अर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी मदत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील आणि शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतच आहे.

परंतु जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. काही प्रमाणात शहरातील नागरिकांनी शासकीय नियमाचे काटेकोर पालन केले आहे, परंतु बेजबाबदार लोकांना अजुनही आळा बसत नाही. त्यांची मनमानी अजुनही चालू आहे. त्यामुळेच अहमदनगर शहरात जवळपास सहा भागात कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून जाहीर केला आहे. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा शिवाय सर्व भाग बंद केला आहे.

परंतु आता बेफिकीरीने वागणारे लोकांना कडक आणि कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मा जिल्हाधिकारी साहेब यांनी कालच शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशन च्या हद्दीत चेक पोस्ट तयार केली आहेत. त्यामुळे दुचाकीवर दोनतीन जण बसून जाणारे, चारचाकी मध्ये चारपाच बसुन जाणारे यांना चाप लागणार आहे. तसेच संचारबंदी च्या काळात  सायंकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत या भागात विनाकारण रस्त्यावर फिरताना जर कोणी आढल्यास तसेच काही अघटित घडले तर त्याचेवर कडक कारवाई करून दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी विनाकारण हौस म्हणून घराबाहेर पडू नये.

तसेच जर कोरोनाचा प्रसार वाढतच राहीला तर कदाचित अहमदनगर जिल्हा प्रशासनास पुन्हा पुर्वीच्या प्रमाणे पुर्ण जिल्हा लाॅकडाऊन करावा लागेल आणि दिवसा सुद्धा संचारबंदी लागू करण्यात येऊ शकते. प्रशासनाने व्यापारी, व्यवसायिक, किरकोळ विक्री करणारे लोक, भाजीपाला विक्री करायला काही अटी शर्तीवर परवानगी दिली आहे. परंतु जाणून बूजून फक्त काही बेजबाबदार लोकांच्या बेफिकीरीमुळे सर्वच सर्व सामान्य जनतेला त्रास होण्याची शक्यता आहे. आता कुठे तरी गोरगरीब लोकांची अर्थिक घडी बसायला लागली आहे. एमआयडीसी मधील अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.

त्यामुळे त्यांचेवर अवलंबित असणारे अनेक छोटे छोटे व्यवसाय सुरू झाले आहेत आणि रोजगार उपलब्ध झाला आहे. आता शहरातील कापड बाजारातील “कोहिनूर” मध्ये काही कामगार कोरोना बाधीत सापडले आहेत. वास्तविक पाहता लाॅकडाऊन च्या काळात पुर्णपणे कापडबाजार बंदच होता. आता थोडे फार दुकाने सुरू झाली होती तोच अशी अपत्ती कापड बाजारावर आली आहे. त्यामुळे कापड बाजारात बफर झोन म्हणून जाहीर केला आहे व सर्व दुकाने बंद केली आहेत.

कापडबाजार  सुरू झाला तर पुन्हा जास्त गर्दी होईल या हेतूनेच कदाचित महापालिका प्रशासन यांनी कठोर भूमिका घेतली असावी. परंतु जर व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर काही तरी मार्ग नक्की निघाला असता. कदाचित अजून ही जर व्यापारी वर्गा बरोबर चर्चा केली तर त्यावर काही तरी उपाय निघू शकतो.अहमदनगर शहर आणि उपनगरातील बराचसा भाग हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केला आहे व सिलबंद केला आहे. परंतु अजुनही पार्सल च्या नावावर  रात्री उशिरापर्यंत काही हाॅटेल व काही चायनीज च्या गाड्या सुरूच असतात.

वास्तविक पहाता प्रशासनाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत किरणा  दुकाने,  वाईन शाॅप व इतर खाजगी  ऑफिस आणि उद्योग व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे असतानाच अनेक ठिकाणी पान टपरी, नाश्ता गाड्या, मावा गुटखा सुरू आहेत. तसेच शहरात जर बाहेरील लोकांना येण्याची बंदी आहे तर मग बरेचसे लाॅज कसे सुरू आहेत हे सुद्धा महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी पहाणे गरजेचे आहे. तसेच शहरातील अवैद्य दारूचे धंदे बंद आहेत असे सांगितले जाते तर मग रस्त्यावर व तुरूंगावर दारू पिऊन फिरणारे लोकं सकाळी सकाळीच कसे काय दिसतात ? हा सुद्धा एक अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे.

वास्तविक पाहता प्रत्येक पोलिस स्टेशन च्या हद्दीत अवैद्य धंदे आहेतच, पण या कोरोना महामारी च्या काळात तरी हे अवैद्य धंदे बंद करावेत असे वाटते आहे. आता कालच मा जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांचेशी तातडीने बैठक घेतली आहे. त्यामुळे कदाचित आता बेजबाबदार लोकांना चांगलाच चाप लागण्याची शक्यता आहे. त्या साठी महापालिका प्रशासन यांनी नेमणूक केलेल्या वाॅर्ड ऑफीसर आणि कर्मचारी यांनी प्रामाणिक पणे काम करणे गरजेचे आहे.

अगोदरच वार्ड ऑफीसर यांचे कामकाजाचे बाबतीत अहमदनगर मधील सर्व सामान्य जनता समाधानी नाही. आज पासुन नागरिकांनी सतर्क रहावे व खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी आता जर शासनाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले तर त्यांचेवर रितसर गुन्हा दाखल करण्यात येईल व दंड सुद्धा आकारला जाईल . नागरिक हो, अजुनही कोरोनाचे भय संपले नाही याची जाणीव असू द्या. प्रशासन, लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि इतर कोरोना योद्धे आपला जीव धोक्यात घालून जे काही काम करत आहेत ते आपण सुरक्षित रहावे म्हणूनच करत आहेत.

यापुढे येणारे सणउत्सव घरीच राहूनच साजरे करणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर वापरणे हे बंधनकारक आहे याची जाणीव असू द्या. आपल्या एका चुकी मुळे आपल्या  कुटुंबातील सर्व्य व्यक्तींना कोरोना बाधीत करू नका हि विनंती. आता ख-या अर्थाने पोलिस प्रशासन यांची कसोटी पहाणारा काळ आहे.

कारण एखाद्या मोठ्या माणसांवर कारवाई करायची असेल तर अनेक फोन येतात. कारण गोरगरीब कधीच नियम मोडत नाहीत.त्यांना माहीत असते की, आपल्याला वाचवणार कोणी नाही. ज्यांच्या राजकीय व शासकीय ओळखी आहेत असेच फक्त काहीच बेजबाबदार लोकच नियमाचे उल्लंघन करतात हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रथम अशा बेजबाबदार लोकांना सुद्धा कायद्याचा वचक दाखवलाच पाहिजे. नागरिक हो  आपल्याला या संकटांतुन जर बाहेर पडायचे असेल तर घराबाहेर पडू नये हि विनंती. घरीच रहा सुरक्षित रहा.

ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
99 22 545 545

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment