अहमदनगर :- जिल्ह्यातील राहाता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्याचा चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, या गोळीबारात राहाता पोलिस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झाले.
सोनसाखळी चोरणाऱ्या दोघा संशयितांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. बुधवारी दुपारी १.२० वाजता राहता शहरातील मध्यवस्तीत झालेल्या या घटनेत एक पोलिस जखमी झाला. एका आरोपीला कट्ट्यासह पकडण्यात पाेलिसांना यश आले, तर त्याचा साथीदार मात्र फरार झाला.
पकडलेला आराेपी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी आहे. दोन संशयित पल्सर मोटारसायकलीवर तोंडाला रुमाल बांधून राहता शहरात फिरत असल्याचे पाहून गस्तीवर असलेले कॉन्स्टेबल अजित अशोक पठारे व रशीद शेख यांना त्यांचा संशय आला. ते त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.
संशयित आरोपी शिवाजी चौकातून चितळी रोडने गणेशनगरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना दुचाकी आडवी घालून थांबवण्याचा प्रयत्न केला. कॉन्स्टेबल पठारे याने मागे बसलेल्याची कॉलर पकडली. मात्र आराेपी सचिन ताके याने गावठी कट्ट्यातून पठारे यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी पठारे यांच्या गालाजवळ लागली. मोठी जखम झाल्याने रक्ताची धार लागली. सर्व कपडे रक्ताने भरले. या झटापटीत पोलिसांची दुचाकी खाली पडली.
कॉन्स्टेबल शेख दुचाकीखाली अडकले, पण त्यांनी याही परिस्थितीत सचिनला पकडून ठेवले. आरोपी झटापट करत असताना दोन तरुणांनी त्यांना पकडण्यासाठी मदत केली. पाेलिसांनी आराेपी सचिनला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले आहे.