अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जिनिव्हा : चीनमध्ये न्यूमोनियासारख्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गूढ विषाणूचा अर्थातच कोरोनाव्हायरसचा जगभर फैलाव होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ने मंगळवारी व्यक्त केली आहे.
सध्या तरी या व्हायरसचे मानवातून मानवामध्ये संक्रमण होण्याचे प्रमाण मर्यादित दिसून येत असले तरी संघटनेने जगभरातील रुग्णालयांना यासंबंधीचा इशारा जारी केला आहे. कोरोनाव्हायरसमुळे सामान्य सर्दीपासून तीव्र श्वसन सिंड्रोम अर्थात सार्ससारख्या आजारांचीही लागण होऊ शकते.
चीनमध्ये थैमान घालत असलेल्या या व्हायरसचा एक रुग्ण थायलंडमध्येदेखील सापडला आहे. थायलंडमध्ये एका चिनी महिलेमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर तिला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
प्रथमच चीनबाहेर हा विषाणू सापडल्याचे थाई प्रशासनाने सोमवारी सांगितले. चीनच्या वुहान शहरात आतापर्यंत या नवीन प्रकारच्या न्यूमोनियाचे ४१ रुग्ण आढळले आहेत.
एका रुग्णाचा मृत्यूसुद्धा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे ‘डब्ल्यूएओ’ने याची गंभीर दखल घेत जगभरातील रुग्णालयांना इशारा जारी केला आहे. आमच्याकडील माहितीनुसार सद्य:स्थितीत कुटुंबातील व्यक्तींमध्ये मर्यादित स्वरूपात या विषाणूचे संक्रमण होत असल्याचे चित्र आहे; परंतु पूर्णपणे मानवातून मानवांमध्ये संक्रमण होत असल्याचे सद्य:स्थितीत दिसून येत नाही, असे ‘डब्ल्यूएचओ’च्या नवीन आजार युनिटच्या प्रमुख असलेल्या मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या.
एकंदर स्थिती लक्षात घेत या विषाणूचा फैलाव जगभर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.