अहमदनगर : नगर-कल्याण रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवरील पाठीमागील बाजूस बसलेल्याने महिलेच्या गळ्यातील सव्वाचार तोळ्याचे दोन गंठण चालत्या दुचाकीवरून ओरबाडून नेले.
चालत्या दुचाकीवरून दागिने ओरबडल्यामुळे खाली पडून महिला जखमी झाली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सुनील परसराम कदम (वय ५१रा.जामगाव, ता. नगर) हे त्यांची पत्नी उषा हिच्यासमवेत दुचाकीवरून चालले होते.
जखणगाव शिवारातून जात असताना त्यांच्या दुचाकीसोबत एक विना क्रमांकाची दुचाकी समान अंतरावर चालत होती. चालकाने उषा कदम यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठण व साडेसात ग्रॅम वजनाचे मिनी गंठण असे सव्वाचार तोळ्यंाचे दागिने हिसकावून घेतले व दुचाकीचा वेग वाढवून पसार झाला.
चालत्या दुचाकीवर हिसका बसल्यामुळे उषा कदम या खाली पडून जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात सुनील कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.