अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या निवड प्रक्रियेत महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने योग्य व प्रामाणिक व्यक्तींना सेवा करण्याची संधी देण्याबाबत व साईबाबा संस्थान शिवसेनेकडे ठेवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर यांनी कोपरगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आ. आशुतोष काळे यांची विश्वस्त मंडळात नियुक्तीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
पत्रात मुकुंद सिनगर यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यात निवडून आलेल्या आमदारांपैकी कोपरगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार आशुतोष काळे हे एक स्वच्छ, निष्कलंक व जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे.
साईबाबा संस्थानसंबंधित अनेक विषयाबाबत त्यांना सखोल ज्ञान असून, साईभक्तांचे व स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. सहकार महर्षी कर्मवीर स्व. शंकरराव काळे यांचे अहमदनगर जिल्हा विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान असून, आमदार काळे हे त्यांचा वारसा अतिशय भक्कमपणे सांभाळत आहेत.
या पत्रावर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हाप्रमुखासह जिल्हा कार्यालयप्रमुख ॲड. राहुल नवले, कोपरगावचे कक्ष उपजिल्हाप्रमुख सुधाकर वादे, कक्ष उपजिल्हाप्रमुख सुनील गीते, कक्ष उपजिल्हाप्रमुख अशोक थोरे, कोपरगाव कक्ष तालुकाप्रमुख अशोक पवार, कक्ष शहरप्रमुख रवींद्र कथले, राहुल देशपांडे, यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कक्षप्रमुखांच्या सह्या आहेत.