अहमदनगर Live24 टीम :- एखादा व्यक्ती मृत झाला तर नातेवाईक खांदा देतात, ग्रामस्थ, शेजारी-पाजारी, शेवटच्या कार्यासाठी म्हणून हजेरी लावतात. कुठल्याही अंत्यविधीचे हेच चित्र असते.मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने यात मोठा बदल झाला आहे.
कोरोना दबा धरून बसलाय, मृत्यूनंतरही तो परवड करतोय हे बदलत्या अंत्यसंस्कार पद्धतीने समोर आलेय. अहमदनगर शहरात सध्या लॉकडाऊनच्या काळात १५ ते २० लोकांच्या उपस्थितीमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याचे दुःख असताना ‘लॉकडाउन’मधील निर्बंधांमुळे अंत्यसंस्कारास उपस्थित राहणे शक्य नसल्याने बाहेरगावच्या नातेवाइकांनी व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेताना दुःखद अंतकरणाने मृत व्यक्तीला अखेरचा निरोप द्यावा लागत आहे.
कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘लॉकडाउन’ व संचारबंदीमुळे प्रवासावर बंधने आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी बाहेरगावी जाणे वा बाहेरगावातून येणेही अडचणीचे झाले आहे.
अशा स्थितीत मृत व्यक्तीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. व्हिडिओ कॉलद्वारे बाहेरगावी असलेल्यांना अंत्यदर्शन व अंत्यसंस्कार विधी दाखवले जात आहेत.
अंत्यविधीला नेहमी असणारी गर्दीही आता कमी झाली आहे. कोणत्याही अंत्यविधीला शे-दीडशेंची उपस्थिती असते. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असेल तर पाचशे-हजारांवर उपस्थिती असते.
आता ‘करोना’मुळे चार खांदेकरी, चार शेजारचे आणि चार जवळच्या नातेवाईकांचा समावेश असतो. निधनाची वार्ता कळाल्यानंतर नातेवाइकही अमरधाममध्ये कोणीही येऊ नका, असेच सांगत आहेत. त्यामुळे अमरधाममध्ये फारसे कोणी जात नाहीत.
गर्दी झाली तर संसर्ग होऊ शकतो म्हणून कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावेत व अमरधाममध्ये सोशल डिस्टंन्सिंगही पाळण्याच्या सरकारच्या सूचना आहेत.
त्याचप्रमाणे वेळ वाचवण्यासाठी बहुतांश अंत्यविधी विद्युत दाहिनीत केले जात आहेत. यामुळे सध्या अहमदनगर शहरातील अमरधाममध्ये स्मशान शांतता पसरली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®