कोरोनाचा शिरकाव झाल्याने ‘त्या’ भागात संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण तयार होऊन औषध दुकानेही बंद राहिली. येत्या मंगळवारपर्यंत शहरात संपूर्ण लाॅकडाऊन प्रशासनाने जाहीर केला.

-पाथर्डी तालुक्‍यातील मोहोजदेवढे येथे पहिला करोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 26 संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

त्यांच्या घशातील स्त्राव पुणे येथील लष्करी वैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी सांगितले. तसेच साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी 5 मेपर्यंत आरोग्यसुविधा वगळता संपूर्ण तालुक्‍यात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.

शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पाथर्डीला धाव घेतली. शहरातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेवून मोहोजदेवढे येथे भेट देवून, गावाकडे येणारे सर्व रस्ते सील करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखे, तालुका आरोग्य डॉ. भगवान दराडे यांच्याशी विचार-विनिमय करून मोहोजदेवढे गाव रात्रीच सील करण्यात आले.

10 मे पर्यंत हे गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 24 तास या गावात विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत.

तालुक्‍यात करोना रुग्ण आढळल्यानंतर आमदार मोनिका राजळे यांनी आज सकाळी तत्काळ बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेतला व रोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागात यापूर्वी फारशी खबरदारी घेतली जात नव्हती.

मात्र बाधित रुग्ण आढळल्यानंतर अनेक गावांनी गावाबाहेर जाण्यासाठी व गावात नवीन व्यक्तींना येण्यासाठीचे रस्ते बंद करून मनाई केली आहे. प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, गावात नवीन येणाऱ्यावर समितीमार्फत करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment