कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित; नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींची लवकर चाचण्या होणे आवश्यक आहे.

त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या. कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे.

त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे किंवा मनात किंतू बाळगण्याचे कारण नाही. कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यानंतर किरकोळ प्रमाणात ताप, अंग दुखणे, मळमळ होणे आदी लक्षणे जाणवतात.त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणावेळी जिल्ह्यात चार आरोग्य कर्मचाऱ्यांना जाणवलेली लक्षणे याचप्रकारची होती. त्यामुळे कोणताही गैरसमज या लसीकरणाविषयी नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज डॉ. म्हैसेकर यांनी कोरोनाविषयक बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित,

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल आठरे, जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. एस. दीपक आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या, बाधितांच्या प्रमाण व त्याची टक्केवारी तसेच जिल्ह्यात कोणत्या भागात सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण जास्त आहे, याची माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी त्यांना माहिती दिली. जिल्ह्यात ज्या भागात सध्या बाधितांचे प्रमाण आढळून येत आहे, तेथे चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी.

त्याचबरोबर, ज्यांचा व्यवसाय अथवा फिरण्याच्या निमित्ताने इतरांशी दैनंदिन संपर्क होण्याची शक्यता जास्त आहे, अशा व्यक्तींच्याही चाचण्या घेतल्या जाव्यात, असे त्यांनी सांगितले.

ज्या व्यक्तींचे ॲटीजेन चाचण्या निगेटीव आलेल्या आहेत, अशा व्यक्तींना लक्षणे असतील तर त्यांच्या आरटीपीसीआर चाचणी केली जावी. राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना त्यांनी दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!