अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देश व राज्यभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढीत असून या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आता संपूर्ण आळा घालण्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत असलेल्या ४ खाजगी रुग्णालयांत गुरुवार पासून सशुल्क लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिवाय महापालिकेच्या ७ आरोग्य केंद्रांमध्ये संपूर्णपणे मोफत लसीकरण करण्यात येत आहे.
शहरातील १० खाजगी हॉस्पिटल शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत आहेत. त्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार आनंदऋषी हॉस्पिटल, स्वास्थ्य हॉस्पिटल, साईदिप हॉस्पिटल व नोबल हॉस्पिटल या ४ हॉस्पिटलला प्रत्येकी १०० डोसेस महापालिकेकडून बुधवारी देण्यात आले आहेत.
त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये गुरुवार पासून लसीकरण सुरु करण्यात आले असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. अहमदनगरमध्ये कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पार पडला. यामध्ये फ्रंटलाईन कोरोना योद्धा असलेले आरोग्य कर्मचाऱ्याना ही लस देण्यात आली.
त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे हे डोस उपलब्ध झालेले होते. या नंतर आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. त्यामध्ये ६० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षे वयोगटातील इतर आजार असलेले अतिजोखमीचे रुग्ण यांचे लसीकरण सुरू झाले आहे. हे लसीकरण महापालिकेच्या शहरातील सात आरोग्य केंद्रांवर पूर्णपणे मोफत केले जात आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|