अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-
गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत असलेली कोरोना लस आज़ जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली आहे. जामखेडमध्ये आरोग्य सेविका ज्योती पवार यांना सर्वात प्रथम लस देण्यात आली.
तालुक्यातील ७९९ आरोग्य कर्मचारी, खासगी डॉक्टर व अंगणवाडी सेविकांनी लसीसाठी आपली नोंदणी केली आहे. एकूण ७९९ लोकांसाठी जामखेड येथे कोविड १९ लस आली असून, ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आठ ते दहा महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जग हैराण झाले होते.
मात्र, आता कोरोनाची लस आली आहे. कोरोनाने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. लस देण्याचा पहिला मान जामखेड ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेविका ज्योती पवार यांना देण्यात आला आहे.
या वेळी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, बीडीओ कोकणी, डॉ.कुंडलिक अवसरे, डॉक्टर असोसिएशयनचे अध्यक्ष डॉ. भरत देवकर, डॉ. शिंदे, डॉ. हांगे, डॉ. प्रवीण मंडलेचा, शाम जाधवर, अधिपरिचारिका सातपुते, माळी आदी उपस्थित होते.
सध्या वैद्यकीय क्षेत्रातील, शासकीय, निमशासकीय (फ्रंटलाईन) कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी दिली. लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरणासाठी नऊ गटांत वर्गीकरण करण्यात आलं आहे.
पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यांतील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved