निघोज : पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली. पती-पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात असून गंभीर जखमी आहेत.
निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे १ मे रोजी त्यांची पत्नी रुख्मिणी मंगेश रणसिंग (वय १९) यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते.
त्यापूर्वी या पती-पत्नीचे स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाली. म्हणून रुक्मिणी ही माहेरी निघून गेली होती. मंगेश रूख्मिणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रुख्मिणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली.
यावेळी रुख्मिणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता वरील तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.
घराला कूलूप लावून निघून गेले. शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मंगेश व रुक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तीचे वडील काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता.
याबाबत पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रुक्मिणी यांचा जबाब घेतला. पोलिसांनी तिचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले असून रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार आहे.