अवैधरित्या पाणी उपसा करणारे कृषिपंप जप्त

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर : तालुक्यातील आंबीदुमाला येथील कोटमारा धरणातून अवैधरित्या पाणीउपसा सुरूच आहे. शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात मोहीम हाती घेत धरणात टाकण्यात आलेले शेतीचे वीजपंप ताब्यात घेतले.

संगमनेर तालुक्यातील आंबी-दुमाला येथील कोटमारा धरणातून शेतीसाठी होणारा अवैध्य पाणी उपसा थांबवावा अशी मागणी बोटा येथील युवकांनी केली होती. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी साठ्याने तळ गाठताच कारवाई सत्र आरंभिले आहे.

शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाया करताना अनधिकृतपणे पाणी वापरासाठी धरणात टाकलेले बारा वीज पंप जप्त केले.

कोटमारा धरणाची क्षमता १५५ दशलक्ष घनफूट असून आज या धरणात केवळ ५ दशलक्ष घनफूटएवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील बोटा, कुरकुटवाडी, आंबी-दुमाला या गावांच्या पाणी योजनांचा पाणी पुरवठा या धरणावर अवलंबून आहे.

आगामी काळात धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जावा यादृष्टीने नियोजन सुरु आहे.

उपलब्ध व मृत पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांसाठी उर्वरित पाणी राखीव ठेवण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा १०-१५ दिवस पुरेल. पाणी चोरी सुरु राहिली तर सात दिवसात हे पाणी संपण्याची शक्यता आहे.

उन्हाळात होणाऱ्या पाणीचोरीशिवाय पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होत आहे. धरणात सध्या २ ते ३ टक्के पाणी साठा शिल्लक असून पाटबंधारे विभागाने गांभीर्याने कारवाई करणे आवश्यक आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment