अहमदनगर :- सात महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लोणीतील शिक्षकाने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोणी पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला असून त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.
याबाबत पोलिसांकडून समजेली अधिक माहिती अशी : स्टॉक गुरू ही आर्थिक गुंतवणूक करणारी कंपनी सात महिन्यांत आपले पैसे दुप्पट करून देते असे आमिष दाखवत लोणीतील नामांकित शाळेतील शिक्षक सुरेश विनायक खर्डे यांनी फसवणूक करून पैसे उकळल्याचं उघड झाले आहे.
बाभळेश्वर येथील राजेंद्र नामदेव म्हस्के यांनी हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे . २०११ साली राजेंद्र म्हस्के यांना शिक्षक सुरेश खर्डे व विमा कंपनीची एजंट असलेली त्यांची पत्नी स्मिता या प्रत्यक्ष भेटल्या. या दाम्पत्याने त्यांचा विश्वास संपादन करून दोन लाखांची गुंतवणूक करायला लावली.
पैसे सात महिन्यात दुप्पट होणार असा विश्वास देत नोटरी करून पैसे ताब्यात घेतले. मात्र, सात महिने उलटून गेल्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ सुरू ठेवली. अनेकदा पैशाची मागणी केली. मात्र, या ना त्या कारणाने टाळाटाळ केला.
सुमारे आठ वर्षानंतर आपली दोन लाख रुपयांची गुंतवून मिळत नसल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आले. . याप्रकरणी राजेंद्र म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांत सुरेश विनायक खर्डे विरूद्ध भादंवि कलम ४२० व ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.