बाथरूमला जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपीचे पलायन

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले असता, त्याने बाथरूमला जाण्याचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. या घटनेने रूग्णालय परिससरात एकच गोंधळ उडाला.

दरम्यान रूग्णालयाच्या भिंतीवरून उडी मारून तो पसार झाला. मंगळवारी (दि. १०) दुपारी साडेबारा ते एक वाजेच्यादरम्यान ही घटना घडली.

दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोंधवणी रोड परिसरात आठ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. राहुल गणेश शिंदे (वय २०) असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी: मंगळवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी शिंदे याला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात नेले होते. निम्म्या तपासण्या झाल्यानंतर त्याने बाथरूमला जाण्याचा बहाणा केला.

त्यानंतर मुख्य द्वारापाशी आल्यानंतर एका कर्मचाऱ्याला धक्का देवून तो रूग्णालयाच्या बाहेर पळाला. हातात बेड्या असतानाही त्याने रूग्णालयाच्या बाजूच्या भिंतीवरून उडी मारत पळ काढला. यावेळी पोलिसांसमवेत रूग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले.

शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पसार झाला. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची जादाची कुमक दाखल झाली. शहरातील खिलारी वस्ती भागात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील तो आरोपी आहे.

त्याच्यावर प्रारंभी मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता त्यांनी आरोपीला वैद्यकीय तासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.

त्यावेळी त्याने पळ काढला. यावेळी तीन कर्मचारी असल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला, मात्र त्यांचे नाव सांगण्यास असमर्थता दर्शविली.

दरम्यान, आठ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी शिरसगाव हद्दीत त्याचा कसून शोध घेतला. परिसरातील ऊस पिकातही शोधले.

त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोंधवणी रस्त्याजवळ त्याला पकडण्यात यश आले. आरोपीला पकडल्याच्या वृत्तास माहिती उपअधीक्षक राहुल मदने व निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दुजोरा दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment