अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावासह परिसरातील गावात सोमवारी तीन तास मुसळधार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने गावातील दीडशे ते दोनशे घरात पाणी शिरले.
यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. जोराच्या पावसाने पेरणी केलेले सर्व बियाणे वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचेसंकट ओढवले आहे.
सोमवारी दुपारी हवामानात अचानक झालेल्या बदलातून दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत भोजडे, गोधेगाव, दहीगाव बोलका, धोत्रे, तळेगाव मळे, खोपडी, ओगदी या गावात तीन तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
या पावसाच्या पाण्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. धोत्रे गावात दीडशे ते दोनशे घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टरवर पेरणी केलेले सर्व बियाणे वाहून गेले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आधीच कर्ज काढून कशीबशी पेरणी केली होती.
तीही या पावसाने वाहून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews