अहमदनगर: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या बालिकेचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांना या घटनेबाबत विचारले असता, त्यांनी सुटीवर असल्याचे सांगितले.
रूग्णालयात संपर्क केला असता या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. राहुरी तालुक्यातील जांभळी भागातील वावरथ येथे ऊसतोडणी कामगार अनिल शंकर राठोड यांच्या अक्षरा (४) या मुलीला झोपेत सर्पदंश झाला. तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
तेथे या मुलीला दाखल करुन घेण्यास नकार देत खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. खासगी रूग्णालयातही दाखल करुन घेतले नाही, म्हणून नातेवाईक पुन्हा जिल्हा रुग्णालयात मुलीला घेऊन आले. त्यावेळीही डॉक्टरांनी उपचारास नकार दिला.
त्यामुळे मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गाडे यांना विचारले असता मी सुटीवर आहे. तुम्ही जिल्हा रुग्णालयातील दूरध्वनीवर फोन करा, असे सांगून त्यांनी तेथील नंबर दिले.
तेथे संपर्क केला असता या प्रकाराबाबत माहिती देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली. या प्रकाराने शासकीय रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.