अहमदनगर : इक्सप्लोसिवचे नियमांचे उल्लंघन करुन अरणगाव (ता. नगर) येथे बांधण्यात आलेल्या स्फोटकांच्या गोडाऊचा परवाना रद्द करावा.
तसेच फायर ऑडिट न करता व नगररचना विभागाकडून कोणतीही प्रकारची परवानगी न घेता बांधण्यात आलेले सदरील गोडाऊन पाडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रंजना पोटे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगर तालुक्यातील अरणगाव मधील गट नंबर 368/1 आणि 368/2 या गटांमध्ये फटाक्यांचे गोडाऊन बांधण्यात आलेली आहे. सदर गोडाऊन इक्सप्लोसिवच्या नियमानुसार बांधण्यात आलेले नाही. या गोडाऊनचे फायर ऑडिट देखील करण्यात आलेले नसून, गोडावून बांधताना नगररचना विभागाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. सदरील गोडाऊन दुमजली बांधण्यात आलेले आहे.
इक्सप्लोसिवचे नियमानुसार गोडाऊन दोन मजली बांधता येत नाही. गोडाऊन बांधताना इक्सप्लोसिवचे नियमांचे पुर्णत: उल्लंघन करण्यात आले असल्याचे रंजना पोटे यांनी निवेदनात म्हंटले आहे.
या गोडाऊनचे फायर ऑडिट झालेले नसून, नगररचना विभागाकडून परवानगी घेतली नसल्याने हे बांधकाम अनाधिकृत आहे. सदरील स्फोटकांच्या गोडाऊनचा परवाना रद्द करुन गोडाऊन पाडण्याची मागणी त्यांनी केली आहे.