नाशिक जिल्ह्यातील साकुर येथे तमाशा कलावंतांवर झालेला हल्ला पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने निंदनिय असुन, या घटनेचे गांभिर्य ओळखुन राज्य सरकारने दोषी व्यक्तिं विरोधातील खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि राज्यातील तमाशा कलावंतांना संरक्षण द्यावे अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आ.विखे पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील साकुर येथे तमाशा कलावंतांवर झालेला हल्ला आणि जाणिवपुर्वक दिलेल्या त्रासाची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.
महाराष्ट्राच्या भूमिला असलेला सांस्कृतीक वारसा जोपासण्याचे महत्वपुर्ण काम तमाशा कलावंत वर्षानुवर्षे करीत आहेत. या कलाकारांमुळेच महाराष्ट्राची ओळख टिकुन आहे याकडे लक्ष वेधुन, ग्रामीण महाराष्ट्रात जत्रा आणि यात्रेच्या निमित्ताने तमाशाचे कार्यक्रम सुरु असतात.
आधुनिकतेच्या काळात लोक कला लोप पावत असताना तमाशा कलाकार अतिशय मेहनतीने या कलेला पुढे घेवुन जाण्याचे काम करीत आहेत. मात्र साकुर येथील घटनेमुळे तमाशा कलावंतांचे मनोधैर्य खचले असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेवून तमाशा कलावंतांना तातडीने संरक्षणाची गरज पत्रात व्यक्त केली.
साकुर येथील घटनेत सहभाग असलेल्या समाज विघातक प्रवृत्तींनी तमाशा फडातील पुरूष व महिला कलावंतांना दिलेल्या त्रासाचे गांभिर्य खुप मोठे आहे. दोषी व्यक्तिंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला
तरी या घटनेतील व्यक्तिंविरोधातील खटला जलदगती न्यायालयात चालविण्या संदर्भात तसेच तमाशा कलावंतांना संरक्षण देण्याबाबतचे निर्देश गृह विभागाला देवून तमाशा कलावंतांना न्याय द्यावा असेही आ.विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.