शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ठेकेदाराचा मा. खा. गांधी यांना पुळका का ?

Ahmednagarlive24
Published:

पारनेर: म्हसणेफाटा येथील औद्योगिक वसाहतीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार, शेतकऱ्यांसाठी भूखंड यासाठी माजी खासदार दिलीप गांधी यांनी किती वेळा आवाज उठवला, असा सवाल करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या ठेकेदाराचा गांधी यांना पुळका का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केला.

अवैध गौण खनिज उपसाप्रकरणी तहसीलदार ज्योती देवरे यांनी म्हसणेफाटा येथील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ठेकेदारांवर केलेल्या दंडात्मक कारवाईवर संशय व्यक्त करून गांधी यांनी देवरे यांना निलंबित करून चौकशीची मागणी केली आहे.

गांधी यांच्या या भूमिकेचा पवळे यांनी खरपूस समाचार घेत त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. स्वतःच्या मुलासाठी बहुराष्ट्रीय कंपनीचा मोठा ठेका मिळवण्यासाठी गांधी कंपनीच्या अधिकाऱ्यांची तळी उचलत असल्याचा आरोपही पवळे यांनी केला.

ठेकेदारीवरून याच वसाहतीमध्ये दोन गटांत मारामाऱ्या झाल्या, त्यावेळी गांधी यांनी अावाज उठवला नाही. म्हसणेफाटा येथील औद्योगिक वसाहतीसाठी जमिनी अधिग्रहित करण्यापासून शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.

बागायती क्षेत्राचे निकष लावणे गरजचे असताना ते लावण्यात आले नाहीत. स्थानिक बेरोजगारांच्या रोजगाराबाबतीतही अन्याय होत आहे.

भूखंडांच्या परताव्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत असताना लोकप्रतिनिधी या नात्याने गांधी यांनी त्यावर कधी आवाज उठवला हे जाहीर करावे, असे आव्हान पवळे यांनी दिले.

जमिनींच्या परताव्यात मोठा गैरव्यवहार झाला असून ठरावीक लोकांचेच उखळ पांढरे झाले आहे. स्थानिकांच्या प्रश्नांसंदर्भात कंपनीच्या भूमिपूजनास आलेल्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अटक करून डांबण्यात आले.

दरम्यान, गांधी यांनी कंपन्यांनी कोट्यवधींचा महसूल भरल्याची जी आवई उठवली आहे, तो महसूल केवळ मुरूमापुरता मर्यादित आहे.

तेथे आढळून आलेल्या वाळू, खडी, सॅन्डक्रशचा महसूल कोण भरणार, असा सवाल पळवे यांनी केला. गांधी यांनी केलेले आरोप खोटे आहेत. शरद पवळे यांचा सवाल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment