राहुरी :- मित्रांसमवेत मुळा धरणात पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली. प्रशांत उत्तम खांडेकर (वय १५, जांभळी, ता. राहुरी) असे या मुलाचे नाव आहे.
मृतदेह दुपारी साडेबाराच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. मुळा धरणाच्या बॅकवाटरमध्ये प्रशांत हा मित्र अप्पा बाचकर, अनिल खेमनर, अंकुश बाचकर यांच्यासह पोहायला गेला होता.

त्या ठिकाणी मेंढ्या धुण्याचे काम सुरू होते. मागील काही दिवसांपासून या मेंढ्या जांभळी परिसरात आल्या होत्या. पाण्यात बुडी घेतल्यानंतर प्रशांत पुन्हा वर न आल्याने सवंगड्यांनी त्याचा शोध सुरू केला.
मात्र, ठावठिकाणा न लागल्याने जांभळीचे सरपंच रामदास बाचकर, उपसरपंच पाटीलबा बाचकर, नामदेव खेमनर, दादा बाचकर आदी घटनास्थळी आले.
भागवत पवार, भाऊराव पवार, रामनाथ पवार व सहकाऱ्यांनी एक तास प्रयत्न केल्यानंतर प्रशांतचा मृतदेह सापडला.