अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राष्ट्रीय महामार्ग 222च्या यासाठी शेतकर्यांच्या जमिनी 2018 मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या. सदर जमिनी संपादित करताना कुठलाही विचार न करता त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. यामध्ये काही क्षेत्र बागायती, काहींच्या फळबागा अशा अनेक जमिनी होत्या.
या सर्व जमिनी सरसकट जिरायती दाखविण्यात आल्या. त्यामुळे अनेक त्रुटी आहेत. सदर त्रुटी शासनास वेळोवेळी निवेदनाद्वारे दाखवून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच या कामी झालेल्या अंतिम निवाड्यातील त्रुटींचे निरसन होणे गरजेचे आहे.
या निरसनासंदर्भातील निवेदन केडगाव, निंबळक, नेप्ती, अरणगाव व सोनेवाडी येथील बाधित शेतकर्यांच्या वतीने खासदार सुजय विखे पा. यांना देण्यात आले.
यावेळी सर्वश्री. नीलेश गुंजाळ, आबूज मेजर, पोपट कराळे, अशोक कोतकर, माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, गणेश गुंड, विजय कोतकर, संतोष कोतकर, विशाल राहिंज, गणेश कराळे, नगरसेवक सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, युवराज कोतकर, विशाल कराळे, गणेश नन्नवरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने केलेल्या चुका शेतकर्यांच्या माथी मारल्या जात आहेत. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. निवाडा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची परिपत्रके, मोजणी शीट, तसेच केलेले मुल्यांकन याच्या प्रती शेतकर्यांना देण्यात आलेल्या नाहीत.
उलट माहिती अधिकाराचे अर्ज करायला लावणे, नाहक त्रास देणे अशा प्रकारे शेतकर्यांची पिळवणूक केली जात आहे. बाह्यवळण रस्त्याचे रुंदीकरण अकृषीक क्षेत्र, विहिर, बोअर, बागायती, औद्योगिक, येलो झोन यामधून झाले आहे. परंतु निवाडा करताना या बाबी विचारात घेतलेल्या नाहीत.
संयुक्तिक मोजणी विवरण पत्रात बराचसा भाग, तेथील मत्ते हे नजरचुकीने राहिले असून, या निवड्यात आलेले नाहीत. याचा परिणाम सदर बाब अॅब्रिटेशनमध्ये गेली असता, त्याबद्दल शेतकर्यांना स्टॅम्प ड्युटी भरण्याचे आदेश दिलेले आहेत.
शासनाची चुकी असताना देखील स्टॅम्प ड्युटी शेतकर्यांच्या माथी मारली जात आहे. ही शेतकर्यांनी का भरावी. ही बाब चुकीची शेतकर्यांची सर्व बाजूंनी गळचेपी होत आहे, असे ही निवेदनात म्हटले आहे.
खा. विखे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर या कामी लक्ष घालण्याचे मान्य केले असून, कोणत्याही शेतकर्यावर अन्याय होणार नाही. बाधित शेतकरी व शासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले.